कसळाबाई शंकर पवार आश्रमशाळेच्या नूतन वास्तूची आमदार मा.श्री किशोरआप्पा पाटील यांच्याहस्ते दिमाखात पायाभरणी; ऊसतोड कामगार, शेतकरी व गोरगरीबांच्या लेकरांसाठी उभारणार नविन ज्ञानमंदिर
पाचोरा : ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या स्वप्नांना आता भक्कम वास्तूची साथ मिळणार आहे. ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव हरेश्वर संचलित श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वरसाडे तांडा यांच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. आ. श्री. आप्पासो. किशोर धनसिंग पाटील यांच्या शुभहस्ते नूतन वास्तूची पायाभरणी करण्यात आली.
वरसाडे तांडा आणि परिसरातील ऊसतोड कामगार, शेतकरी तसेच गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची नवी संधी देणाऱ्या या आश्रमशाळेसाठी नूतन वास्तू उभारली जात असल्याने पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी उभे राहणार ‘ज्ञानमंदिर’
दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकरी कुटुंबातील आणि ऊसतोड कामगारांच्या संसारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम आश्रमशाळेच्या माध्यमातून केले जात आहे. इथे अनेक अडचणींवर मात करत ही मुले शिक्षण घेत आहेत. आता त्यांच्या शिक्षणासाठी नवीन, भव्य आणि सुसज्ज वास्तू उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे वातावरण आहे. ही केवळ इमारत नसून, अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणारे ज्ञानमंदिर ठरणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला लाभली शोभा..
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा. श्री. भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, मा. सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी, श्री. गणेश भिमराव पाटील, मा. भाऊसो. मधुकर सुकदेव काटे आणि मा. भाऊसो. उद्धव दत्तू मराठे उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती पाचोरा उपसभापती सौ. ताईसो. रत्नप्रभा अशोक पाटील, ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष. श्री. आप्पासो. श्री. प्रभाकर शामराव पाटील , मा. श्री. नानासो. अर्जुन शेनफुंड जाधव, मा. श्री. नानासो. सुकदेव तोताराम गिते, मा. श्री. आप्पासो. देविदास रामदास महाजन, मा. श्री. प्रकाश बाजीराव पाटील, मा. श्री. आप्पासो. अॅड. अरुण नारायण कुलकर्णी, मा. श्री. बापूसो. बसंतीलालजी हस्तीमल चौपडा, मा. श्री. नानासो. भास्कर धनजी पाटील, मा. श्री. भाऊसो. अशोक कृष्णराव पाटील, मा. श्री. दादासो. रविंद्र श्रीपत जाधव, मा. श्री. दादासो. सुकदेव विठ्ठल गिते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच पिंपळगाव हरेश्वरच्या सरपंच सौ. सुनंदाताई कैलास क्षिरसागर आणि वरसाडे तांडा सरपंच सौ. सुरेखा पवन पवार यांचीही उपस्थिती होती.
ज्यांनी ही वास्तू लवकरात लवकर उभी राहावी यासाठी झटपट प्रयत्न केले व निर्णय घेतले ते म्हणजे ग्राम विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. गिते रविंद्र सुकदेव यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालकांमध्ये मा. श्रीमती पाटील विजयाबाई दिलीप, मा. श्री. सोनवणे दीपक हरिसिंग, मा. श्री. राठोड रंगलाल गोविंदा, मा. श्रीमती बडगुजर लता किशोर, मा. श्री. गरुड भैय्या विलास मधुकरराव, मा. श्री. डॉ. तेली शांतिलाल गेंदीलाल, मा. श्री. सलीमखा अलीयारखा, मा. श्री. पाटील बाळूमाऊ यशवंत प्रभाकर, मा. श्री. देव मिलिंद दत्तात्रय, मा. श्री. पाटील अशोक कृष्णराव, मा. श्री. पाटील अशोक दत्तू, मा. श्री. पाटील देविदास गिरधर, मा. श्री. पवार राजमल ओंकार आणि मा. श्री. बडगुजर प्रदीप रघुनाथ यांचा समावेश होता. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राठोड साईदास भुरा आणि प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राठोड सतीश रंगलाल यांच्यासह शिक्षकवृंदही यावेळी उपस्थित होते.
नव्या वास्तूसोबत नव्या स्वप्नांना मिळणार भरारी
नूतन इमारतीच्या पायाभरणीने आश्रमशाळेच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कष्टकरी पालकांच्या मुलांना चांगले शिक्षण, चांगले वातावरण आणि पुढे जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने उभारली जाणारी ही वास्तू भविष्यात अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरणार आहे.
एका बाजूला कष्टकरी पालकांचे घामाने भिजलेले हात आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची स्वप्ने पाहणारी त्यांची मुले... या स्वप्नांना आता नूतन वास्तूची भक्कम साथ मिळणार आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साह, आपुलकी आणि आनंदाची किनार लाभली.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा