जामनेर तालुक्यातील पठाड तांड्यावर जागेच्या वादातून मारहाणीचा आरोप; फिर्यादीची फत्तेपूर पोलिसांत NC, न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाणार
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पठाड तांडा येथे सार्वजनिक जागेच्या वादातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनिल भंगी राठोड यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून घरासमोरील त्यांच्याच ताब्यातील मालकीच्या जागेच्या वापरावरून शेजारी असलेल्या प्रेमराज सोना राठोड, गोविंदा लालसिंग राठोड आणि लालसिंग भिका राठोड यांनी वारंवार वाद घातला. याबाबत अनेकदा वादविवाद झाल्यानंतर दि. २५ जून २०२६ रोजी संबंधितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा तसेच "आमच्या नादी लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही" अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने फत्तेपूर पोलीस ठाण्यात NC दाखल केली असून, प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तीनही आरोपींच्या सख्या नात्यातील महिला गावच्या सरपंच आहे. सरपंचपद आरोपींच्या नात्यात म्हणजे घरातचं असल्याने सरपंचपती व आरोपी कोणालाही जुमानत नसल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. गावातील वाद मिटविण्याऐवजी संबंधितांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असून धमकावले जात असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. गावातील वाद सोडविण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडूनच वाद वाढत असल्याने गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना फिर्यादीने व्यक्त केली.
याप्रकरणी फिर्यादी अनिल भंगी राठोड यांनी, "पोलीस प्रशासनाकडून योग्य न्याय मिळाला नाही तर गरज भासल्यास न्यायालयात दाद मागणार," असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
टीप : या वृत्तातील सर्व आरोप हे फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतील असून, संबंधित आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा