वरसाडे तांड्यावरून उभा राहिलेला सूर : ओम साई बँन्डची यशोगाथा.. वार्षिक टर्नओव्हर 40-50 लाख....

यश म्हणजे अचानक मिळालेली संधी नाही, तर संकटांशी झुंज देत, परिस्थितीवर मात करत घडवलेली गोष्ट असते. ग्रामीण भागात, विशेषतः तांड्यावर जन्मलेल्या तरुणांसाठी शिक्षण, संधी आणि साधनांची कमतरता ही नेहमीचीच बाब असते. अशाच परिस्थितीतून मार्ग काढत, आपल्या कलेच्या जोरावर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या तरुणाची ही कथा आहे साईदास चव्हाण (साई) आणि त्याच्या “ओम साई बँन्ड, वरसाडे” या प्रवासाची.



एका तांड्यावर जन्मलेला साई लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. गावातीलच आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत तो सातत्याने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत राहिला. नववी-दहावीतही त्याने पहिला व दुसरा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. शिक्षणाच्या जोरावर पुढे जाऊन नोकरी करायची, कुटुंबाची परिस्थिती सुधारायची, अशी त्याची मनापासून इच्छा होती.

दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्याने पिंपळगाव हरेश्वर येथे अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. घरापासून पाच किलोमीटर अंतर… कधी पायी चालत, तर कधी मित्रांच्या सायकलवर बसून हा प्रवास करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती कठीण होती, पण मनात शिकण्याची जिद्द होती.

मात्र अकरावी-बारावी झाल्यानंतर वास्तवाने वेगळेच वळण घेतले. वडिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की आता पुढे शिकवण्याची ऐपत नाही, शेताची वाट धरावी लागेल. साईसाठी हा मोठा धक्का होता. अनेक स्वप्ने तुटली, पण तो खचला नाही.

साई फक्त अभ्यासातच नव्हे, तर लहानपणापासूनच त्याच्या अंगी विविध कला होत्या. त्यातील सर्वात मोठी आवड म्हणजे संगीत आणि वाद्ये. ढोल, तबकडी, भोंगे यांचा सूर त्याला खुणावत होता. याच आवडीच्या जोरावर त्याने पिंपळगाव हरेश्वर येथील महाराष्ट्र बँन्ड व सचिन बँड इथे काम करण्यास सुरुवात केली. येथे त्याला केवळ कामच नाही, तर शिस्त, कार्यक्रम व्यवस्थापन, लोकांशी संवाद आणि संगीताचा व्यावसायिक अनुभव मिळाला. पुढे सचिन बँडच्या मालकाने साई यांना त्याचा मालकीचा बँन्ड सुरु करण्यास खुप मदतही केली.

साईने वर्षभर प्रामाणिकपणे काम केले. लग्नाचा सीजन संपल्यानंतर त्याने एक धाडसी निर्णय घेतला. कामाचा मोबदला म्हणून पैसे न घेता, स्वतःचा बँन्ड सुरू करण्यासाठी लागणारे जुने साहित्य त्याने घेतले. त्याच्याकडे सुरुवातीला फक्त एक हातगाडी, दोन तबकडी, एक ढोल, दोन भोंगे, माईक आणि थोडेफार साहित्य होते. पण स्वप्न मोठं होतं.

2002 वर्षातला हा फोटो


याच साधनांवर “ओम साई बँन्ड” ची सुरुवात झाली. पहिली सुपारी फक्त 1501 रुपयांची होती, ज्या काळात पंचक्रोशीतील इतर बँन्ड 3000 ते 4000 रुपये घेत होते. याच कमी दरामुळे वाडी, वस्ती, तांडे आणि गोरगरीबांच्या शुभकार्यांत ओम साई बँन्डला मोठी मागणी निर्माण झाली.

लग्नाचा सीजन संपल्यानंतर बँन्ड सुरू करूनही, पहिल्याच सीजनमध्ये साईने तब्बल 105 लग्नसोहळे वाजवले आणि जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. साईचा आवाज, त्याचे सूर आणि लोकांना आनंद देण्याची वृत्ती यामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. तो अनेकदा एक-दोन गाणी जास्त वाजवून लोकांचा आनंद द्विगुणित करत असे. परिणामी गावागावात ओम साई बँन्डची चर्चा सुरू झाली.

या बँन्डमुळे पंचक्रोशीतील अनेक तरुणांना सीजननुसार काम करून उत्पन्नाची संधी मिळू लागली. काम वाढत गेल्यावर वेळेचे महत्त्व ओळखून साईने हातगाडीऐवजी भाड्याने रिक्षामध्ये बँन्ड सेट तयार केला, जेणेकरून कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहोचता येईल.

 

2006 साली साई यांच्या स्वता:च्या लग्नातील एक क्षण



2008 वर्षातला हा फोटो


ऑर्डर वाढत गेल्या, अंतर वाढू लागले. रिक्षा अपुरी पडू लागल्यावर साईने स्वतःची पिकअप/टेम्पो गाडी घेतली, तिला व्यवस्थित सजवले आणि बँन्डसाठी योग्यरित्या तयार केले. इथूनच ओम साई बँन्डचा सुवर्णकाळ सुरू झाला. आता 100 ते 200 किलोमीटर अंतरावरील लग्नसोहळ्यांच्या ऑर्डर येऊ लागल्या. दोन-दोन महिने आधी बुकिंग होऊ लागले. सिजनमध्ये एकही दिवस रिकामा जात नव्हता. या प्रवासात पत्नी व मुलांचेही मोलाचे सहकार्य साईला मिळाले.

 


मध्यंतरी डीजे संस्कृती वाढल्याने बँन्डच्या ऑर्डर कमी झाल्या. पण साईने हार मानली नाही. त्याच्याकडे असलेल्या साऊंड सिस्टीमच्या जोरावर त्याने भजन, कीर्तन, सप्ताह यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांकडे आपला मोर्चा वळवला. आता त्याचा आवाज फक्त लग्नसमारंभातच नाही, तर धार्मिक कार्यक्रमांतही घुमू लागला.

काही धार्मीक कार्यकर्मातले क्षण

  
कोरोना महामारीत विलगीकरण सेंटर येथील धार्मीक कार्यक्रम

आज ओम साई बँन्ड, वरसाडे हा केवळ एक बँन्ड नसून एक यशस्वी व्यवसाय ठरला आहे. आज ओम साई बँन्ड नविन मोठ्या आयसर गाडीत दिमाखात डौलतं आहे. या बँन्डचा वार्षिक टर्नओव्हर 40-50 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. वर्षाला लग्नसोहळे, साखरपूडा, भजन , हरीनाम सप्ताह इत्यादी  कार्यक्रम मिळून वर्षाला २५० पेक्षा अधिक कार्यक्रम साई यशस्वीपणे पार पाडतात. एकुण लागणारा खर्च वगळता 50% पेक्षा अधिक नफा त्यांना मिळत असतो. तांड्यावर जन्मलेला, साधनांची कमतरता असलेला हा तरुण आज ग्रामीण भागातील अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरतो आहे.



साईदास चव्हाण यांची ही यशोगाथा एकच गोष्ट शिकवते  परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत, कला आणि चिकाटी यांच्या जोरावर यश नक्की मिळवता येते.. 

शब्दलेखन : विलास नवले

Youtube Link :- https://youtube.com/@saichavan6837?si=FrnLB341SNZtOwyw



टिप्पण्या