वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत संबंधित भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नागरिकांच्या घरी भेट देऊन मतदारांची माहिती तपासत आहेत.
या प्रक्रियेमध्ये ज्या महिला व पुरुष मतदारांची नावे सुमारे २० वर्षांपासून मतदार यादीत आहेत, त्यांची नावे बहुतांश सुरक्षित मानली जात आहेत. त्यामुळे अशा जुन्या मतदारांना विशेष अडचण येण्याची शक्यता कमी आहे.
मात्र ४० वर्षांखालील काही मतदारांच्या बाबतीत अधिक तपासणी केली जात आहे. अशा मतदारांचे नाव कायम ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांचे नाव सुमारे २० ते २२ वर्षांपूर्वीच्या मतदार यादीत होते का, याची पडताळणी केली जात आहे. यासाठी BLO घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत.
दरम्यान, लग्न झालेल्या महिला मतदारांसाठी प्रक्रिया थोडी अधिक किचकट असल्याचे दिसून येत आहे. विवाहित महिलेचे नाव मतदार यादीत सुरक्षित राहण्यासाठी तिच्या माहेरच्या गावातील माहितीची पडताळणी केली जाते. यासाठी महिलेने माहेरचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गावाचे नाव तसेच वडील किंवा आईचे नाव BLO यांना सांगणे आवश्यक आहे. संबंधित गावातील जुन्या मतदार यादीत ही माहिती योग्य आढळल्यासच त्या महिलेचे नाव सुरक्षित राहते.
जर अशा प्रकारे पडताळणी होऊ शकली नाही, तर संबंधित मतदाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच मतदाराचे नाव यादीत कायम ठेवले जाते.
निवडणूक आयोगाने मान्य केलेले काही प्रमुख पुरावे पुढीलप्रमाणे आहेत :
पासपोर्ट
जन्म दाखला
शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी किंवा समकक्ष)
कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल)
केंद्र किंवा राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र / पेन्शन आदेश
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
वनहक्क प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शासनाकडून मिळालेल्या जमीन किंवा घर वाटपाचा दाखला
स्थानिक स्वराज्य संस्थेची कुटुंब नोंदवही / नोंद
१ जुलै १९८७ पूर्वीचे सरकारी नोंदवहीतील कागदपत्र
आधार कार्ड (ओळख पुरावा म्हणून)
राष्ट्रीय नागरिक नोंदणीतील (NRC) नोंद (लागू असल्यास)
इतर अधिकृत सरकारी नोंदीतील प्रमाणपत्र
दरम्यान, अनेक मतदार कामानिमित्त घराबाहेर असल्यामुळे पडताळणीच्या वेळी ते घरी नसतात. त्यामुळे आपल्या वरसाडे प्र पा भागातील BLO गणपत भिंगोले सर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही, तर मतदारांनी किंवा कुटुंबप्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन नाव पडताळणीसाठी BLO यांना प्रत्यक्ष भेटावे, असे त्यांनी सांगितले.
मतदारांनी वेळेत पडताळणी पूर्ण केल्यास भविष्यात मतदानाचा हक्क अबाधित राहण्यास मदत होणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा