वडगाव नालबंदी, भडगाव येथील पोलीस पाटलांच्या अनुपस्थितीमुळे अवैध धंद्यांना उत; नागरिकांमध्ये असंतोष प्रांताधिकाऱ्यांकडे थेट तक्रार, कारवाईची मागणी
भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी या गावात पोलीस पाटील या महत्त्वाच्या पदावर सोनाली सुदाम राठोड ही महिला कार्यरत आहे. पंरतु पोलीस पाटील ही महिला ज्या गावाची पोलीस पाटील आहे त्या संबंधित गावात वास्तव्यास नसल्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित महिला पोलीस पाटील या आपल्या कार्यक्षेत्रातील गावात न राहता भडगाव येथे वास्तव्यास आहेत. याचा थेट परिणाम त्यांचे गावातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होत असल्याचे गावकरी सांगत आहेत.
गावात सध्या अवैध दारू विक्री, जुगार, सट्टा तसेच इतर बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या बाबत गावातील नागरिकांनी वेळोवेळी पोलीस पाटील यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या असता, तक्रारींची दखल घेण्याऐवजी संबंधित पोलीस पाटील यांचे पती अरेरावीची भाषा वापरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, सदर पोलीस पाटील यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती गावच्या सरपंचपदी आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून सरपंचपद कायमच त्याच कुटुंबात राहावे व यापुढेही राहावे यासाठी गावातील कोणालाही विरोध करता येऊ नये अशी भूमिका त्याच्याकडून घेतली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. “गावात काय चालू आहे याबाबत आम्ही काहीच करणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा,” असे उत्तर सामान्य नागरिकांना दिले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गावातील सजग नागरिक पृथ्वीराज दगडू राठोड यांनी थेट प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज सादर करत पोलीस पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर तक्रार दाखल केली आहे. अर्जामध्ये, पोलीस पाटील यांनी का
र्यक्षेत्रात वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना त्याचे उल्लंघन होत असून, अवैध धंद्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना धमकावण्याच्या प्रकाराचीही चौकशी करून योग्य ती प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर प्रांताधिकारी कार्यालयाकडून काय भूमिका घेतली जाते, चौकशीचे आदेश दिले जातात का, तसेच संबंधित पोलीस पाटील यांच्यावर कारवाई होते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अवैध धंद्यांवर तातडीने आळा घालावा आणि सामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा