वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत ठरावावर बेकायदेशीर सही केल्याचा आरोप, गटविकास अधिकाऱ्यांकडे नागरिकाची तक्रार, कारवाईची मागणी..
भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील ग्रामपंचायतीमध्ये गंभीर स्वरूपाचा प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई शिवाजी जाधव यांनी अधिकार नसताना ग्रामपंचायत ठरावावर सरपंचाचा शिक्का वापरून सरपंचाच्या जागेवर स्वतःची सही करून ठराव मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून लोकशाही व्यवस्थेचा भंग करणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत गावातील नागरिक पृथ्वीराज राठोड यांनी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीसोबत ग्रामपंचायतीच्या प्रोसिडींग बुकची प्रत तसेच संबंधित ठरावाची प्रत जोडण्यात आली असून, या कागदपत्रांमधून संबंधित ठरावावर सरपंचाऐवजी ग्रामपंचायत सदस्याची सही असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, सरपंचाचा अधिकार वापरून ठराव पास करणे हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन असून, अशा प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित सदस्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीररीत्या मंजूर करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी तक्रारदार पृथ्वीराज राठोड यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा