प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तक्रारदारास महिला पोलीस पाटील यांच्या पतीकडून धमकी प्रकरण चिघळले; वडगाव नालबंदी, भडगाव येथीलं तक्रारदाराने थेट जळगाव पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली..

 जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वडगांव नालबंदी गावातील महिला पोलीस पाटील यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार केल्यानंतर तक्रारदारास धमकावण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात व पोलीस अधिक्षक कार्यालयास लेखी तक्रार दाखल करत संरक्षण व कठोर कारवाईची मागणी केली आहे.








तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, वडगांव नालबंदी गावच्या महिला पोलीस पाटील या त्यांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास नसून तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत. यामुळे गावात अवैध दारू विक्री, हातभट्टी व इतर बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वारंवार तोंडी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने तक्रारदाराने दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी, पाचोरा यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला होता.

मात्र, प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 03 सप्टेंबर 2025 रोजी महिला पोलीस पाटील यांचे पती तसेच त्यांचे भाऊ गावात येऊन तक्रारदारास धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “तू माझ्या नादी लागू नकोस, आम्ही पोलिस पाटील आहोत, गावचे सरपंचपद आमच्याच घरात आहे, तुला खोट्या केसमध्ये अडकवू,” अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.



विशेष म्हणजे, महिला पोलिस पाटील यांचा पती हा भडगाव येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्याच्या घरात गावच्या सरपंचपदाची जबाबदारी असल्याचा उल्लेखही धमकीदरम्यान करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये भय व असुरक्षिततेची भावना पसरली आहे.


या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तक्रारदाराने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे सविस्तर अर्ज सादर केला असून, महिला पोलीस पाटील यांचे निलंबन, त्यांच्या पती व भावाविरोधात कायदेशीर कारवाई तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान, प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, चौकशीचे आदेश दिले जातात का, तसेच धमकीप्रकरणी गुन्हा दाखल होतो का, याकडे संपूर्ण पाचोरा व भडगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

टिप्पण्या