ग्रामपंचायत वडगाव नालबंदी, भडगाव येथे बेकायदेशीर शिपाई भरतीचा आरोप; पृथ्वीराज दगडू राठोड यांची प्रशासनाकडे तक्रार...
(प्रतिनिधी | पंचक्रोशी)
ग्रामपंचायतीने कोणतीही अधिकृत जाहिरात न देता, ग्रामसेवकाची मंजुरी न घेता व कोणतीही पारदर्शक निवड प्रक्रिया न राबवता शिपाई पदाची भरती केल्याचा गंभीर आरोप गावातील नागरिक पृथ्वीराज दगडू राठोड यांनी केला आहे. या प्रकरणामुळे गावातील अनेक पात्र व बेरोजगार तरुणांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारीनुसार, सदर भरतीबाबत ग्रामसभेत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही तसेच अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामपंचायतीच्या मर्जीतील व्यक्तीस थेट नोकरी देण्यात आल्याचा संशय निर्माण झाला असून, ही कृती नियमबाह्य व लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी असल्याचे राठोड यांनी नमूद केले आहे.
ग्रामपंचायत ही सार्वजनिक संस्था असून, येथे होणाऱ्या प्रत्येक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, समान संधी व शासन निर्णयांचे पालन अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात संबंधित नियमांना बगल देत भरती करण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे गावातील इतर सुशिक्षित व पात्र तरुणांना संधीपासून वंचित राहावे लागले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर भरती तात्काळ रद्द करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी पृथ्वीराज दगडू राठोड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा