वरसाडे तांडा (पाचोरा) गावात अनेक वर्षापासुन बेकायदेशीर अतिक्रमण, दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ. ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..


आज वरसाडे तांडा येथीलं परिस्थिती पूर्ण बदलली आहे. गावात कुणाला अचानक अटॅक आला, किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर अनेकांच्या घरापर्यंत अँम्बुलन्स तर दूर, कोणतीही गाडी पोहोचू शकत नाही. आजारी माणसाला उचलून मेन रोडपर्यंत आणावं लागतं. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतदेह सुद्धा घरापर्यंत पोहोचत नाही लोकांना कितीतरी अंतर खांद्यावर उचलून न्यावं लागतं. 

(हो, गावाची अवस्था खरंच इतकी बिकट झाली आहे...)


1976 सालचं एक पत्र आजही गावाच्या शिस्तीचं, नियमांचं आणि चांगल्या प्रशासनाचं उदाहरण देतं. त्या काळातीलं वरसाडे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी गावातील सुकदेव नवले या ग्रामस्थाला नव्या घराच्या बांधकामासाठी परवानगी देताना स्पष्ट अट घातली होती.

“बैलगाडी ये-जा करू शकेल असा रस्ता सोडावा आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने बांधकाम करावे.”

त्या काळातील सरपंचाचे नाव माहित नाही. पण ते अत्यंत हुशार व महान असतीलं.


त्या काळी 1976 ला , म्हणजे 50 वर्षापुर्वी वरसाडे गावात फार शिकलेले पुढारी नव्हते तरी सुद्धा नागरिकांकडून रीतसर अर्ज घ्यायचे, नियमानुसार तपासणी करूनच परवानगी द्यायचे. घर बांधताना लोक रस्ता सोडायचे, ये-जा सुलभ व्हावी यासाठी काळजी घेतली जायची.


मागच्या काही वर्षापासुन गावात काही लोकांनी मिळेल त्या जागेवर ताबा किंवा अतिक्रमण केले. आज गावात अतिक्रमण इतकं वाढलंय की, ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढायची हिम्मतच होत नाही. कारण, सत्तेत असलेले आणि अतिक्रमण करणारे हे बहुतेक वेळा एकमेकांचेच लोक असतात.


एक काळ होता की, गावाच्या मध्यातून मोठे ट्रक जात असत. ट्रकमध्ये भरलेला कापूस गावातून सहज बाहेर पडायचा. रस्ते मोकळे, सुटसुटीत होते.

आज मात्र ग्रामपंचायत दप्तरी 200–300 चौ.फु. जागा नोंद असलेली व्यक्ती प्रत्यक्षात 800–1000 चौ.फु. ताब्यात घेऊन बसलेली आहे. काहींनी तर 2000 चौ.फु. जागा बेकायदेशीररीत्या बळकावून ठेवली आहे.

वार्ड क्र. 3 मध्ये असलेली थोडी गावठाण जागा होती ती सुद्धा ग्रामपंचायतीने नियमानुसार न देता बेकायदेशीर पद्धतीने वाटून टाकली. ताबा घेणाऱ्यांनी ना रस्ता सोडला, ना इतर सोयीसुविधांसाठी जागा.

कुठल्याही नियोजनाशिवाय, कुणाचं घर दक्षिणेकडे तोंड करून, कुणाचं पश्चिमेकडे, तर कुणाचं उत्तरेकडे अशा बेढब रचनेत वस्ती उभी राहत आहे.

भविष्यात ही वस्ती सुधारेल कशी?

तिथे पाईपलाईन कशी टाकणार?

तिथे रस्ते, गटारी, पाणीपुरवठा यांचं नियोजन कसं होणार?

अनेक अडचणी डोळ्यासमोर आहेत.


गावातीलं जागृत लोकांचा फक्त एकच प्रश्न आहे. ग्रामपंचायतीत किंवा एखाद्या भावी नेत्यामध्ये अतिक्रमण काढण्याची खरी हिम्मत आहे का ?


गावातील जनतेची एकमुखाने मागणी आहे की, अतिक्रमण काढा आणि गावाला पुन्हा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवा.


panchkroshi news

varsade pra pa

टिप्पण्या