पिंपळगाव हरेश्वर : शिक्षणाच्या पवित्र मंदिराला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी शाळेच्या बसचालकाने बसमधीलच दहावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सशंयीत नराधम चालक आबिद हुसेन शेख जलील (वय 38) याला अटक केली आहे.
घटना कशी उघड झाली?
दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र पीडितेचा सविस्तर जबाब घेतल्यानंतर पोलिसांसमोर लैंगिक अत्याचाराचे सत्य समोर आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गंभीर कलमं लावून आरोपीस ताब्यात घेतलं.
सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहे.
या घटनेनंतर शाळकरी मुले व त्यांच्या पालकांत मोठी दहशत निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शाळा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह..
शाळेच्या बसमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे व्यवस्थापनातील ढिलाईचे द्योतक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये महिला परिचारिका नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही पालकांनी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाची कसून चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
घटनेनंतर पाचोरा - पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशी मधील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांतर्फे तीव्र संताप व्यक्त होत असून, शिक्षण खात्याने अशा शाळांची जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा