वरसाडे तांडा येथे बाबा रामदेवजी ग्यारस निमित्त तरुण मंडळी भजनात तल्लीन, गाव भक्तीमय, जेष्ठ गावकऱ्यांचे कौतुक...
वरसाडे प्र पा ( पाचोरा ) भाद्रपद शुक्ल एकादशी, म्हणजेच बाबा रामदेवजी ग्यारस हा बंजारा समाजाचा मोठा सण. ग्यारस उत्सव फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून अकरा दिवसांच्या सतत भजन-कीर्तनासह चालतो, बाबा रामदेवजीवरीलं श्रद्धेने वरसाडे तांड्यातील तरुण मंडळी सलग अकरा दिवस रात्रभर भजनात तल्लीन झाली आहेत..
21व्या शतकात मोबाईल, सोशल मिडियाच्या युगात तरुणांनी भजनाची आवड जपली, ही साधी बाब नाही. त्यांच्या भक्तीभावाने आणि उत्साहाने गाव भक्तीमय झाले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आनंदी झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
सलग अकरा दिवस रात्री चालणारा हा भजनोत्सव तांड्यातील वातावरण भक्तीमय करत असून बाबा रामदेवजींच्या ग्यारस उत्सवाला अधिक तेजस्वी बनवत आहे...
बाबा रामदेवजींना अनेक समाजातील लोक भक्तीभावाने मानतात. राजपुत समाज , बंजारा समाज, मेघवाल / मेघवंशीय समाज, चामर समाज, माळी समाज, हरिजन समाज, मुस्लिम समाजातील काही पीर भक्त देखील त्यांना पीर म्हणून मानतात. त्यामुळे फक्त तांडा नव्हे तर पुर्ण पंचक्रोशी रात्रभर भक्तीमय वातावरणात मग्न झाली आहे.
बाबा रामदेवजी हे १४व्या शतकातील एक महान संत, लोकदेवता आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनात समानता, एकात्मता आणि समाजसेवा यांना प्राधान्य दिले. त्यांनी उच्च-नीच, श्रीमंत-गरीब यातील भेदभाव नाकारून सर्वांना समान मानले. त्यांचा संदेश सर्वधर्मसमभावाचा होता. मुस्लिम पिरांनाही त्यांनी आपले भक्त केले आणि कदाचित म्हणुनचं त्यांना रामशाह पीर म्हणून ओळखले जाते. बाबा रामदेवजींचे भक्त सांगतात की, त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारी घटनांची नोंद आहे. एक प्रसंग असा आहे की, भैरव राक्षस या दुष्ट शक्तीला पराभूत करून त्यांनी लोकांचे रक्षण केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा